वरणगाव येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात भाविकांची उसळली गर्दी चारशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारी भक्तांचा मोठा उत्साह; मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप

वरणगाव, ता. भुसावळ तालुका प्रतिनिधी गोपी अण्णा:
वरणगाव-बोदवड रस्त्यावरील सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे प्राचीन श्री नागेश्वर महादेव मंदिर तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. पहाटेपासूनच भगवान नागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिराकडे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. दिवसभर मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’ च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारी नागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. तिसऱ्या सोमवारीही वरणगावसह परिसरातील गावांमधून तसेच दूरवरून आलेल्या भाविकांची मंदिरात मोठी गर्दी झाली होती. अनेक भाविकांनी महादेवाला बेलपत्र, फुले, दूध व जल अर्पण करून पूजा अभिषेक केला.मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप – -श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने व मनोरंजनाची साधने उभारण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लहान मुलांसाठी आकाश पाळणा, ड्रॅगन पाळणा, विविध लहान पाळणे, रेल आगगाडी, म्युझिकल डान्स, स्विमिंग तसेच विविध खेळांची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांसोबतच लहान मुलांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे.महिलांसाठी कटलरी तसेच विविध घरगुती वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. खेळणी, शोभेच्या वस्तू आणि इतर साहित्याची दुकानेही मोठ्या प्रमाणात लागली आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर खरेदीसाठीही नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.उपवासाच्या पदार्थांची रेलचेल – -श्रावणातील उपवास लक्षात घेऊन विविध उपवासाचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साबुदाणा वडा, फळाहार, दराबा, गुळाची जिलेबी यांसह विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर भाविकांची गर्दी होत आहे. विशेषतः गरमागरम साबुदाणा वडा आणि गुळाची जिलेबी खाण्यासाठी भाविकांची मोठी पसंती दिसून येत आहे.प्राचीन मंदिराबाबत भाविकांमध्ये श्रद्धा – -श्री नागेश्वर महादेव मंदिर हे परिसरातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे हे प्राचीन मंदिर असल्याने मंदिराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते अनेक भाविकांकडून नवस अभिषेक व धार्मिक विधी केले जातात ट्रस्टकडून व्यवस्थेसाठी परिश्रम – -भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरातील व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये, मंदिर परिसरात शिस्त राहावी तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व्यवस्थित पार पडावेत यासाठी ट्रस्टकडून नियोजन करण्यात आले आहे.श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत बढे सर, सदस्य भागवत पाटील, गोविंदा माळी, भैय्यासाहेब देशमुख, दिनेश बढे, शाम पाटील सर, उमेश पाटील, ज्ञानेश्वर पाचपांडे, मुरली माळी, भरत नारखेडे, ज्ञानेश्वर परदेशी तसेच मंदिराचे पुजारी भोपळे महाराज आदी ट्रस्टी व सेवेकरी मंदिरातील व्यवस्था सांभाळण्यासाठी परिश्रम घेत आहेत श्रावणातील पुढील सोमवारीही मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, त्यासाठी मंदिर ट्रस्टकडून आवश्यक नियोजन केले जात आहे. प्राचीन श्री नागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.









