ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावळ बार्टीच्या कौशल्य विकास उपक्रमाला निधी द्या; 11 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला!संघरत्न सपकाळे यांची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मागणी


भुसावळ प्रतिनिधी : गोपी अण्णा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांना यंदा निधी उपलब्ध न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन वर्षांत या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या 11 हजार 202 विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे भुसावळ तालुका अध्यक्ष संघरत्न सपकाळे यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन सादर केले आहे.अनुसूचित जाती प्रवर्गातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यात व्यावसायिक कौशल्ये विकसित व्हावीत आणि त्यांना रोजगारक्षम बनवता यावे, या उद्देशाने बार्टीच्या कौशल्य विकास विभागामार्फत 2014 पासून विविध प्रशिक्षण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत हजारो युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे.मात्र, यंदा निधीअभावी प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमांना निधीअभावी खंड पडल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर आणि रोजगाराच्या संधींवर होण्याची शक्यता आहे.गेल्या तीन वर्षांत 11 हजार 202 विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याचा तपशील समोर आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना लाभ देणाऱ्या योजनेच्या सातत्याबाबत अनिश्चितता निर्माण होणे ही चिंतेची बाब असल्याचे सपकाळे यांनी नमूद केले आहे. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या निधीचे नियोजन, उपलब्ध निधीची स्थिती आणि उपक्रमांच्या परिणामांचे मूल्यमापन याबाबत स्पष्टता असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.अनुसूचित जातीतील तरुणांच्या रोजगारक्षमतेशी आणि भविष्याशी निगडित असलेल्या या विषयाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. बार्टीच्या कौशल्य विकास उपक्रमांसाठी तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून प्रशिक्षण प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक नुकसान टाळावे अशी मागणी संघरत्न सपकाळे यांनी केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button