जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा महापौर दीपमाला काळे यांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

जळगाव : जळगाव शहरातील प्रमुख रस्ते, समांतर रस्ते आणि नाल्यांवर अडथळा ठरणारे विद्युत रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर), वीज खांब व वाहिन्या त्वरित स्थलांतरित करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. रस्त्यांमधील अडथळा ठरणारे खांब हटवण्यासाठी किंवा शिफ्ट करण्यासाठी पुढील दोन दिवसांत महापालिका आणि महावितरणचे अधिकारी संयुक्त पाहणी करतील. सर्व लोकेशनची पाहणी झाल्यानंतर तात्काळ खांब हटवण्याची कार्यवाही केली जाईल.वीज खांब व वाहिन्यांच्या स्थलांतरासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्य घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात नव्याने तयार केलेल्या रस्त्यांवर तात्काळ पिवळे आणि पांढरे पट्टे मारावेत, असे निर्देश महापौरांनी दिले. रस्त्यांवर पट्टे मारण्याबाबत महापौर कार्यालयातून वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही दुर्लक्ष केल्याबद्दल महापौरांनी तीव्र खंत व्यक्त केली. “रस्ते तयार झाल्यावर त्यावर पट्टे का मारले जात नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील रस्त्यांची कामे उच्च दर्जाची असावीत आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे खडे बोल सार्वजनिक बांधकाम विभागाला महापौरांनी सुनावले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील,अधीक्षक अभियंता दत्तात्रय साळी, उपअभियंता एस. एल. देवरे.महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश नेमाडे, कार्यकारी अभियंता डी. एन. साळी, एस. डी. उन्हाळे, रोहित गोवे, हर्षल नेहेते, निलेश कुरसंगे, डी. आय. पाटील, कल्पेश सपके, निलेश सावंत, महानगरपालिकाचे शहर अभियंता योगेश बोरोले, विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे आदी उपस्थित होते.












