जिल्हा जळगाव भुसावळ येथील सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याची चोरी; एलसीबीकडून आरोपी जेरबंद

भुसावळ प्रतिनिधी गोपी अण्णा
सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथून शोध घेत त्याला ताब्यात घेतले. मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय 38, रा. पापा नगर, खडका रोड, इराणी वस्ती, भुसावळ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कडून 47 ग्रॅम 48 मिलीग्रॅम सोन्याचा, अंदाजे 4 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 129/2026 तसेच बोदवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 128/2026 भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.दरम्यान, आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोला येथे रवाना झाले. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आरोपीची गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, त्याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील 32 ग्रॅम 400 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे 3 लाख 20 हजार रुपये किमतीची, काढून दिली. पंचांसमक्ष हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच बोदवड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार 15.08 ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, अंदाजे 1 लाख 75 हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. अशाप्रकारे दोन्ही गुन्ह्यांतील एकूण 47 ग्रॅम 48 मिलीग्रॅम सोन्याचा, अंदाजे 4 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ. उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, पोहेकॉ. संदिप चव्हाण, चालक पोलीस कॉन्स्टेबल रिजवान शेख यांचा समावेश होता. तसेच तांत्रिक मदत पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी केली.अटक आरोपीला कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोहेकॉ. विकास बाविस्कर करीत आहेत.








