जिल्हा जळगाव तालुका भुसावल _ वरणगावच्या विकासासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे धाव; समांतर रस्ता, महात्मा फुले सर्कल विकासासह तीन महत्त्वाच्या मागण्या

वरणगाव, ता भुसावळ : प्रतिनिधी गोपी अण्णा
वरणगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शहराच्या जनहिताच्या तीन महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. या मागण्यांमध्ये समांतर रस्त्यासाठी निधी, महात्मा फुले सर्कलचा विकास आणि फुलगाव उड्डाणपुलाखालील जागा नगरपरिषदेला व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. नगरपरिषदेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिर तसेच तिरंगा सर्कल ते महात्मा फुले सर्कल या मार्गाचे समांतर रस्ता, दुभाजक आणि आधुनिक प्रकाश व्यवस्थेसह सुशोभीकरण करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेर गेल्यानंतर जुन्या महामार्गावरील व्यापारी आणि स्थानिक नागरिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, या रस्त्याच्या विकासामुळे शहरातील आर्थिक घडामोडींना पुन्हा गती मिळेल, असे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.याशिवाय, नवीन बायपासवरील महात्मा फुले सर्कल विकसित करून ते शहराचे आकर्षण केंद्र बनविण्याची तसेच फुलगाव उड्डाणपुलाखालील मोकळी जागा वरणगाव नगरपरिषदेला व्यावसायिक वापरासाठी देण्याची मागणीही करण्यात आली. या दोन्ही कामांमुळे शहराच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिन्ही प्रस्ताव जनहिताचे आणि वरणगावच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी तत्काळ दिल्या.
यावेळी गडकरी यांनी वरणगावच्या जनतेने लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सुनील काळे यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाचे कौतुक केले. लोकशाही प्रक्रियेत जनतेने विकासाभिमुख नेतृत्वाची निवड केल्याबद्दल त्यांनी वरणगावकरांचे अभिनंदन करत शहराच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.या भेटीदरम्यान नगरसेवक नाना चौधरी, जनसेवक आकाश निमकर, अजमल खान, फजल शेख, मयूर गावंडे आणि प्रकाश गव्हाळे उपस्थित होते.










