संमिश्र न्यूज जळगाव जिल्ह्यात पावसाचे थैमान हातनुर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण ताकदीनुसार उघडले 3 लाख 15 हजार क्युसेस पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू अमळनेर तालुक्यात महापुराचे संकट गाव गाव जल प्रलय शेती घरे मंदिर परिसरात पाणीच पाणी ता: एरंडोल येथील अंजनी नदीचे पाणी एरंडोल शहराच्या बाजारपट्ट्यात भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू भविष्याबाबत चिंता पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील प्रत्यक्ष मदतीला पोहोचले तर अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले प्रशासन सुसज्ज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आश्वासन दिले

वरणगाव ता भुसावळ प्रतिनिधी (गोपी अण्णा)उत्तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तापी नदीवरील हतनूर धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. वाढत्या पाण्याच्या आवकामुळे धरण प्रशासनाने धरणाचे 41 रेडियल दरवाजे पूर्णपणे उघडून 8,926 घनमीटर प्रति सेकंद (सुमारे 3,15,222 क्युसेक) इतका मोठा पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दि 31 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजेच्या नोंदीनुसार हतनूर धरणाची पाणीपातळी 211.750 मीटर इतकी आहे. धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (एफआरएल) 214.000 मीटर असून धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नसले, तरी पाण्याची आवक कायम असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.धरणात सध्या 268.50 दशलक्ष घनमीटर (69.20 टक्के) इतका एकूण पाणीसाठा असून 135.50 दशलक्ष घनमीटर (53.14 टक्के) इतका उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय सिंचनासाठी कालव्यातून 5.66 घनमीटर प्रति सेकंद (200 क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.धरण परिसरात आज 86 मि मी पावसाची नोंद झाली असून चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान 258 मिमी इतके झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात येत आहे. त्यामुळे पाण्याची आवक आणि विसर्ग यावर धरण प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे.धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने तापी नदीलगतच्या गावांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात मासेमारी, पोहणे, वाळू उपसा किंवा इतर कोणतीही हालचाल टाळावी. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीमधील साहित्य, जनावरे आणि शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पाटबंधारे विभागाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.धरणातील पाण्याची आवक, हवामानातील बदल आणि पावसाचा जोर लक्षात घेऊन विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पुढील काही तास विशेष दक्षता बाळगणे आवश्यक आहे.










