ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव जि.प.मराठी शाळांच्या गुणवत्तेची तपासणी करा स्कूल ठीक करो अभियान’ अंतर्गत गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन!!


जि.प.मराठी शाळांच्या गुणवत्तेची तपासणी करा स्कूल ठीक करो अभियान’ अंतर्गत गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन!!पाचोरा तालुका परिसरातील जिल्हा परिषद मराठी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तसेच शाळांमधील विविध शैक्षणिक व प्रशासकीय बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी समता सैनिक दलाचे जळगाव जिल्हाध्यक्ष मार्शल किशोर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दल शाखा पाचोरा यांच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी पाचोरा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना समता सैनिक दलाचे तालुका प्रचारक ज्ञानेश्वर सावळे व जिल्हा प्रचारक अभिमान बाविस्कर यांनी निवेदन सादर केले. देशभर सुरू असलेल्या स्कूल ठीक करो अभियान च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय व गावनिहाय शाळांचे अहवाल मागविण्याचे अभियान सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शाळांची सर्वांगीण गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती व पटसंख्या, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विषयानुसार अध्ययनाची पातळी, शिक्षकांची नियमित उपस्थिती व अध्यापनाची गुणवत्ता यांची तपासणी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांची अंमलबजावणी, पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, शाळेतील स्वच्छता, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्थाही तपासण्यात यावी,असे निवेदनात म्हटले आहे.याशिवाय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा, मध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी व गुणवत्तेची तपासणी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना दिली जाणारी माहिती, शाळेतील अभिलेख व उपस्थिती नोंदवही तसेच शाळा परिसराची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजनांची ही पाहणी करण्यात यावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.गटशिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्हा परिषद मराठी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन वरील सर्व बाबींची सखोल तपासणी करावी. तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटींवर संबंधितांना आवश्यक सूचना देऊन शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तपासणीचा अहवाल व करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती 15 दिवसांच्या आत देण्यात यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षण अधिकारी,प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच समता सैनिक दल जिल्हा कार्यालय, जळगाव यांना माहितीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.शाळांची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि मूलभूत सुविधांची स्थिती याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा समता सैनिक दलाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button