जळगावात महापौरांची अचानक ‘प्लास्टिकविरोधी’ मोहीम; अनेक दुकानांना दंड..!सराईत विक्रेत्यांना दुकान सील करण्याचा इशारा आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील यांना महापौर दीपमाला काळे यांनी चांगलीच कान उघडली केली तुम्ही करता काय तुमचे काही गोडबंगाल तर नाही ना?

जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी प्लास्टिक बंदीबाबत यापूर्वीच कठोर निर्देश दिलेले होते. सुरुवातीला प्लास्टिक विक्रेत्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून महापौरांकडे येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत, महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दिनांक 26 मे) संध्याकाळी 5 वाजता जळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत अचानक धडक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईमुळे संपूर्ण बाजारपेठेत प्रचंड खळबळ उडाली.मुख्य बाजारपेठेत महापौरांची पायी गस्त; विक्रेत्यांची पळापळ महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः शहरातील राजकमल टॉकीज परिसर, तिजोरी गल्ली, अशोक टॉकीज गल्ली, दाणा बाजार, नेताजी सुभाषचंद्र चौक आणि फुले मार्केट परिसर या अत्यंत गजबजलेल्या भागांमध्ये पायी फिरून प्लास्टिक पिशव्यांची पाहणी केली. महापौर अचानक तपासणीसाठी आल्याचे पाहताच फळ विक्रेते,भाजी विक्रेते, छोटे-मोठे दुकानदार आणि हॉकर्सची एकच पळापळ झाली. अनेकांनी आपल्याकडील प्लास्टिक पिशव्यांचे साठे तात्काळ अज्ञात ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न केला.’ग्राहकांना वस्तू कशात पॅक करून देता?’ महापौरांचा संतप्त सवाल तपासणीदरम्यान अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने हे प्लास्टिक जागेवरच जप्त केले, तर नियम मोडणाऱ्या काही दुकानांना मोठा दंड ठोकण्यात आला. कारवाईदरम्यान महापौर चांगल्याच संतापल्या; त्यांनी विक्रेत्यांना “तुम्ही फळे आणि इतर वस्तू कशामध्ये पॅक करून ग्राहकांना देतात?” असा जाब विचारला, तेव्हा नियमबाह्य प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांकडे बोलायला शब्द नव्हते.तर दुकान थेट ‘सील’ करणार; महापौरांचा कडक इशारा काही दुकानांवर यापूर्वी दोन वेळा कारवाई झाली असून आज त्यांना तिसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला. अशा सराईत विक्रेत्यांना महापौरांनी कडक शब्दांत सुनावले. यावेळी जवाहर क्लोथ स्टोअर्स आणि एच. आर. ट्रेडर्स यांना प्रत्येकी दहा हजार असा 20 हजारांचा दंड करण्यात आला.यापुढे जर तुमच्या दुकानात किंवा हातगाड्यावर विक्रेत्यांकडे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी आढळली तर महापालिकेतर्फे तुमचे दुकान थेट सील केले जाईल.”दीपमाला काळे, महापौर, जळगाव.इको-फ्रेंडली पिशव्या वापरणाऱ्यांचे कौतुक या धडक मोहिमेदरम्यान काही मोजक्या जागरूक व्यापाऱ्यांकडे पर्यावरणाला पूरक अशा ‘इको-फ्रेंडली’ बायोग्रेडेबल थैल्या आणि शासनाचा अधिकृत शिक्का असलेल्या जाड प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. नियम पाळणाऱ्या या व्यापाऱ्यांचे महापौर दीपमाला काळे यांनी कौतुक केले आणि इतर दुकानदारांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. नागरिकांनी देखील घरून निघताना कापडी पिशव्या सोबत घेऊन निघण्याचे आवाहन यावेळी महापौर काळे यांनी केले. या कारवाईत महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कारवाई करताना नगरसेवक रमेश मतानी, आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, रुपेश भालेराव, स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर, मयूर सपकाळे उपस्थित होते.









