जि: जळगाव ता; भुसावल वरणगाव फॅक्टरी वसाहतीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पुलाच्या कठड्यावर बसलेला बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद ; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भुसावल तालुका प्रतिनिधी (गोपाल अण्णा)

वरणगाव, ता. भुसावळ : आयुध निर्माणी वरणगाव कर्मचारी वसाहतीत शनिवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वसाहतीतील क्वॉटर क्रमांक 3, टाईप-2 परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या पुलाच्या कठड्यावर बिबट्या बसलेला आढळून आला. या घटनेचे छायाचित्र कर्मचारी प्रविण चौधरी यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण चौधरी हे शनिवारी रात्री कुटुंबासह श्री सप्तशृंगी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते आपल्या कारने कर्मचारी वसाहतीतील क्वॉटर क्रमांक 3, टाईप-2 परिसराकडे येत असताना पुलाजवळ त्यांना अचानक बिबट्या दिसला. वाहनाच्या प्रकाशात पुलाच्या कठड्यावर बसलेला बिबट्या काही काळ स्पष्टपणे दिसत होता. प्रसंगावधान राखत चौधरी यांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचे छायाचित्र टिपले.बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर चौधरी यांनी परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे विशेषतः क्वॉटर क्रमांक 3, टाईप-2 परिसरात नागरिकांनी तसेच लहान मुलांनी विनाकारण फिरण्यासाठी जाऊ नये, अशी सूचना त्यांनी केली आहे.रिकाम्या क्वॉर्टर्समुळे वाढला झाडाझुडपांचा विळखा – -आयुध निर्माणी वरणगाव प्रशासनाने पूर्वी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निवासस्थाने उभारली होती मात्र कालांतराने कर्मचारी संख्या कमी झाल्याने वसाहतीतील अनेक क्वॉर्टर्स सध्या रिक्त आहेत या रिक्त घरांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे तसेच काटेरी वनस्पती वाढल्या आहेत त्यामुळे वसाहतीतील काही भाग सध्या निर्मनुष्य आणि दाट झाडीने व्यापलेला दिसून येतो.या दाट झाडीमुळे वन्यप्राण्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे बिबट्याचा वावर नेमका कोणत्या भागात आहे, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकतेसोबतच चिंतेचे वातावरण आहे.अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा – -वरणगाव फॅक्टरी वसाहतीत गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे काही कर्मचारी सांगत आहेत यापूर्वीही परिसरात बिबट्याच्या हालचाली जाणवल्याचे तसेच काही ठिकाणी त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र शनिवारी रात्री बिबट्या थेट पुलाच्या कठड्यावर दिसून आल्याने त्याच्या वावराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वसाहतीत अनेक कुटुंबे वास्तव्यास असून नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. सायंकाळनंतर तसेच रात्रीच्या वेळी नागरिक, महिला व लहान मुले घराबाहेर पडत असल्याने बिबट्याच्या वावरामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे वनविभाग व प्रशासनाने तातडीने पाहणी करावी – -बिबट्याच्या दर्शनाच्या पार्श्वभूमीवर आयुध निर्माणी वरणगाव प्रशासनाने संबंधित वनविभागाशी संपर्क साधून परिसराची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच वसाहतीतील वाढलेली झाडे-झुडपे आणि काटेरी वनस्पती हटवून परिसर स्वच्छ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.बिबट्याचा वावर असलेल्या भागाची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देण्यात याव्यात, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.









