ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावळच्या पाणी_ पुरवठ्याला मिळणार बळ; अमृत योजना टप्पा-2 च्या जलकुंभाचे भूमिपूजन मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते अमृत योजना टप्पा-2 चे 80 % काम पूर्ण — रखडलेली टप्पा- 1ची कामेही लवकर मार्गी लावणार


भुसावळ प्रतिनिधी गोपी आण्णा
भुसावळ शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा ठरत असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत योजना टप्पा-2 अंतर्गत जलकुंभाच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. या जलकुंभामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा होऊन नागरिकांना अधिक नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यास मदत होणार आहे.या भूमिपूजन कार्यक्रमास भुसावळ नगर पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती महीमा नागरानी तसेच नगरसेवक किरण कोलते, प्राची पाटील, सोनल महाजन, छाया फालक, निर्मल कोठारी, उद्योगपती मनोज बियाणी यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.अमृत योजना टप्पा-2 चे 80 टक्के काम पूर्ण यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी अमृत योजना टप्पा- 2च्या कामाची माहिती देताना सांगितले की, या योजनेचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, उर्वरित कामेही गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.नवीन जलकुंभामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साठवणूक व वितरणाची क्षमता वाढण्यास मदत होणार असून भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे भुसावळ करांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे मानले जात आहे.टप्पा- 1मधील अपूर्ण कामांवरही कारवाई दरम्यान, अमृत योजना टप्पा- 1मधील काही कामे अद्याप अपूर्ण असल्याची कबुलीही मंत्री सावकारे यांनी दिली. संबंधित ठेकेदारांकडून कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असून, अपूर्ण कामे नवीन ठेके पद्धतीने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना आता गती मिळण्याची शक्यता असून, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे.सत्तापालटानंतर कामाला लागला होता ब्रेक अमृत योजनेच्या कामाबाबत बोलताना मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, भुसावळ नगरपालिकेतील सत्तापालटानंतर काही काळ या कामाला ब्रेक लागला होता. त्यामुळे योजनेच्या कामाच्या गतीवर परिणाम झाला. मात्र आता आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून योजना मार्गी लावण्यावर भर देण्यात येत आहे.शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न भुसावळ शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवरील वाढता ताण आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन या पार्श्वभूमीवर अमृत योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अमृत योजना टप्पा-2 चे उर्वरित काम वेळेत पूर्ण झाले आणि टप्पा- 1मधील रखडलेली कामेही नव्याने मार्गी लागली, तर भुसावळ शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जलकुंभाचे भूमिपूजन झाल्याने या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, आता कामाची गती आणि त्याची गुणवत्ता याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button