ग्रामसभेत महिला पत्रकाराला शिवीगाळ व धमकी; जिल्हा बुलढाणा वडनेर भोलजीत तणावपूर्ण वातावरण नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत महिला पत्रकाराला कथित शिवीगाळ, धमक्या आणि धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. “नारी शक्ती न्यूज पोर्टल”च्या मुख्य संपादिका तथा पत्रकार उमा गोपाल बोचरे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

ग्रामसभेत महिला पत्रकाराला शिवीगाळ व धमकी; वडनेर भोलजीत तणावपूर्ण वातावरण
नांदुरा | प्रतिनिधी
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत महिला पत्रकाराला कथित शिवीगाळ, धमक्या आणि धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. “नारी शक्ती न्यूज पोर्टल”च्या मुख्य संपादिका तथा पत्रकार उमा गोपाल बोचरे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर शासनाने सौ. सुनिता रविंद्र सातव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली असून ग्रामविकास अधिकारी विकास शिवदे हे ग्रामपंचायतीचा कारभार पाहत आहेत. दरम्यान, शुक्रवार दि. २९ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वसाधारण आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील नागरिक विविध विकासकामे आणि समस्यांबाबत प्रश्न विचारत होते. पत्रकार उमा बोचरे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन कामाबाबत माहिती विचारली असता, संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, प्रश्न विचारल्यामुळे प्रशासक सौ. सुनिता सातव यांनी संताप व्यक्त करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच सभास्थळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनीही पत्रकाराला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तू जास्त प्रश्न विचारतेस, तुला मोठ्या प्रकरणात अडकवू,” अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेदरम्यान पत्रकाराच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या काही ग्रामस्थांनाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शालीग्राम जुमडे, राधेश्याम सातव, उमेश नेमाणे, योगेश इंगळे, आशुतोष इंगळे, संतोष इंगळे, शेख सरदार, रामेश्वर बोराडे आणि शांताराम बेलोकार हे साक्षीदार म्हणून उपस्थित असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात सौ. सुनिता रविंद्र सातव, रविंद्र हरीभाऊ सातव, देविदास वाघ, शेख करीम शेख अशपाक, ओम दिघे, संदीप बोचरे, ऋषीकेश देशमुख आणि संतोष दिघे यांच्यासह इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील विविध कलमांनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.घटनेनंतर पत्रकार संघटनांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला धमकावणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पुढे येत आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी नांदुरा पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे.











