ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावळ धावत्या रेल्वेत झोपलेल्या प्रवाशांना लुटणारी टोळी जाळ्यात महिलांच्या पर्समधील 9.70 लाखांचा ऐवज चोरी; 3 आरोपी अटकेत, 7.05 लाखांचा मुद्देमाल जप्त


.

भुसावळ प्रतिनिधी गोपी अण्णा धावत्या रेल्वेगाडीत झोपलेल्या प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महिलांच्या दोन पर्समधून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महागडे मोबाईल असा एकूण 9 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याच्या प्रकरणात अमरावती येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चोरीच्या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यांशी संबंधित एकूण 7 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी ऋषभकुमार रमेशकुमार जैन (वय 30, रा. रायापुरम, चेन्नई, तामिळनाडू) हे कुटुंबीयांसह अमृत भारत एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. गाडीतील एस-7 डब्यातील बर्थ क्रमांक 73 व 76 वर त्यांची आत्या ललितादेवी जैन आणि आई इंद्राकुमारी जैन झोपल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोक्याजवळ ठेवलेल्या दोन पर्स लंपास केल्या.चोरी झालेल्या पर्समध्ये सोन्याची चैन, ब्रेसलेट, अंगठ्या, रोख रक्कम तसेच आयफोन आणि रेडमी कंपनीचे मोबाईल होते. या ऐवजाची एकूण किंमत 9 लाख 70 हजार रुपये होती. जळगाव रेल्वे स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर सुमारे 5 मिनिटांनी जाग आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक गोविंदा पांडव यांच्या मार्ग _दर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघ यांच्या पथकाने भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पंकज दिनकर खडसे याला अमरावती येथून ताब्यात घेण्यात आले.तपासा दरम्यान त्याने प्रणीत गौतम रामटेके याच्या मदतीने चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रणीत हा नागपूर येथे गेल्याचे समजल्यानंतर लोहमार्ग नागपूर पथकाच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात गौरव राजेंद्र अंबादे यालाही अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी अमरावती येथील रहिवासी आहेत.7 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून सोन्याची चैन, अंगठी, आयफोन, पर्स आणि इतर वस्तूंसह 4 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय अन्य गुन्ह्यांशी संबंधित तीन मोबाईलसह अतिरिक्त मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सर्व मिळून 7 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. जप्त केलेल्या काही मोबाईलचा संबंध अकोला लोहमार्ग पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांशी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या कारवाईत लोहमार्ग पोलीस आणि आर पी एफ च्या पथकांनी सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक गोविंदा पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघ व गुन्हे शोध पथक पुढील तपास करीत आहे.रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू व पर्स सुरक्षित ठेवाव्यात आणि झोपताना सामानाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button