एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो श्री म्हणजे वात्सल्य श्री म्हणजे मांगल्य श्री म्हणजे मातृत्व श्री म्हणजे कर्तृत्व श्री म्हणजेच प्रत्येक क्षणाची साथ श्री म्हणजे प्रत्येक अडतळ्यावर मात 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महापौर दीपमाला काळे यांनी आपले विचार मांडले

जिल्हा जळगाव महानगरपालिकेतर्फे महिला दिनानिमित्त उपक्रम : सर्वोत्कृष्ट महिला कर्मचाऱ्यांसह शिष्यवृत्ती धारक, गुणवंतांचा सत्कार जळगावच्या प्रत्येक महिलेमध्ये एक उपजत नेतृत्वशक्ती आहे. महिलांनी आपले मानसिक आरोग्य सक्षम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी दररोज योगा, व्यायाम, पायी चालणे यापैकी एकाला तरी प्राधान्य द्यावे. जेव्हा एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने समाज प्रगत होतो. स्वतःच्या आरोग्याची आणि स्वाभिमानाची जपणूक करा, कारण तुम्ही सक्षम असाल तरच घर आणि शहर सक्षम होईल, असे प्रतिपादन महापौर दीपमाला काळे यांनी केले.जळगाव शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले होते या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, समितीचे सदस्य विद्या सोनवणे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, डॉ. अमृता सोनवणे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर उपायुक्त निर्मला गायकवाड उपायुक्त धनश्री शिंदे उपस्थित होते.प्रस्तावनेमधून निर्मला गायकवाड यांनी जागतिक महिला दिनाविषयी घेण्यात आलेल्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन कार्यक्रम घेण्यामागील उद्देश विशद केला. यावेळी ३ बचत गटांना कर्जाचे धनादेश देऊन मान्यवरांकडून व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यानंतर महानगरपालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षामध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना देखील ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.प्रसंगी महापौर दीपमाला काळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना संबोधित केले. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता प्रशासकीय आणि सामाजिक कामात आपला सहभाग वाढवावा. घरातील आरोग्य जपण्यासोबतच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी स्थायी समिती सदस्य वंदना इंगळे, नगरसेवक पियुष कोल्हे, उज्वला बाविस्कर, जयश्री पाटील, अंकिता पाटील, वैशाली पाटील, कविता शिवदे, प्रतीक्षा सोनवणे, माधुरी बारी, संगीता दांडेकर, कविता पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले तर आभार महिला अधिकारी गायत्री पाटील यांनी मानले.महिलांना कर्करोगाविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन दुपारच्या सत्रात डॉ. ऋचा नवाल यांनी स्तनांचा कर्करोग याविषयी तर डॉ.अंजली भिरुड यांनी गर्भाशयाचा कर्करोग याविषयी उपस्थित महिला भगिनींना सविस्तर माहिती देऊन लक्षणे दिसल्यास तपासणी करण्याचे आवाहन केले. यानंतर महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले यामध्ये महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जागतिक महिला दिनाचा दिवस प्रफुल्लित केला. खेळांमध्ये विजेता ठरलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.










