जिल्हा जळगाव भुसावळ नगरपालिकेच्या सर्व_ साधारण सभेत 31 विषय मंजूर; एका विषयावर गूढ कायम .एका विषयावर उल्हास पगारे यांचा आक्षेप; भाजप-शिवसेना शिंदे गटात अद्याप मनोमिलन नसल्याचे चित्र

भुसावळ प्रतिनिधी गोपी अण्णा
भुसावळ नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत एकूण 32 विषयांपैकी 31 विषय बिनविरोध मंजूर करण्यात आले. मात्र, मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करण्यासंदर्भातील पहिल्या विषयावर नगरसेवक उल्हास पगारे यांनी आक्षेप घेतल्याने या विषयावर निर्णयाचे गूढ कायम राहिले.सभेच्या व्यासपीठावर प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे, भाजपचे गटनेते युवराज लोणारी, मुख्याधिकारी जनार्दन पवार तसेच शिवसेनेचे बबलू बऱ्हाटे उपस्थित होते. सभा सुरू होताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.त्यानंतर नगरपरिषदेच्या मागील सभेचे वृत्तांत कायम करण्या बाबतचा पहिला विषय चर्चेस आला. यावेळी नगरसेवक उल्हास पगारे यांनी सदर विषय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे हा ठराव मंजूर करू नये, सभा तहकूब करावी आणि पुढील सात दिवसांत पुन्हा सभा घेऊन सर्व प्रभागांतील नगरसेवकांच्या विकासकामांशी संबंधित प्रश्नांचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.मात्र, भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी सभा कायदेशीर असल्याचे सांगत ती तहकूब करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पहिल्या विषयावर सभागृहात काही काळ चर्चा झाली. अखेरीस उर्वरित विषयांवर सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवण्यात आले.विकासकामांवर विविध विषयांना मंजुरी सभेत शहरातील विविध विकासकामांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला आले. नगरपालिका दवाखान्यांसाठी औषधांचा पुरवठा, अमृत योजनेतील कामे, शहरातील भुयारी गटार योजनेशी संबंधित कामे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कामे, दलित वस्ती विकासासाठी आलेल्या निधीतून करण्यात येणारी कामे, शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण, नगरोत्थान योजनेअंतर्गत विकासकामे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.भुसावळ शहरात प्रवेश करणाऱ्या वरणगाव रोड, जळगाव रोड आणि यावल रोड या प्रमुख मार्गांवर शहराच्या प्रवेशद्वारांसह सौंदर्यीकरण करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. तसेच नाहाटा चौक, सातारा चौक आणि गांधी चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाचा विषयही सभेत मांडण्यात आला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी आवश्यक संकलन व वाहतूक व्यवस्था करण्यासाठी वाहन उपलब्ध करून देणे, शहरातील विविध उद्यानांमध्ये नागरिक व मुलांसाठी मनोरंजनाची खेळणी बसविणे, नाल्यांवरील पुलांच्या ठिकाणी संरक्षक भिंती व लोखंडी जाळ्या उभारणे, तसेच भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नवीन मक्तेदार नियुक्त करण्याच्या विषयावरही चर्चा झाली. याशिवाय आयत्यावेळी मांडण्यात आलेल्या विविध विषयांवरही सभागृहात चर्चा करण्यात आली.दलित वस्तीचा निधी त्याच भागासाठी खर्च करण्याची मागणी नगरसेवक उल्हास पगारे यांनी दलित वस्ती विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी इतर कामांसाठी वळवू नये, अशी मागणी केली. संबंधित निधीचा वापर दलित वस्तीतील मूलभूत सुविधा व विकासकामांसाठीच करण्यात यावा, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.नगरसेवक सचिन चौधरी यांनी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून त्याकडे प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर नगरसेवक बबलू बऱ्हाटे, राजू आवटे, किरण कोलते, नगरसेविका सोनल महाजन, छाया देशमुख, सोहेल पठाण तसेच इतर माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या सभागृहात मांडल्या.यामध्ये रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, स्वच्छता, नाले तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध स्थानिक समस्यांचा समावेश होता. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे मुख्या धिकारी जनार्दन पवार आणि प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांनी सांगितले.भाजप-शिवसेना शिंदे गटात अद्याप मनोमिलन नाही
राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती असली तरी भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात दोन्ही गटांमध्ये अद्याप अपेक्षित मनोमिलन झाले नसल्याचे सभेच्या निमित्ताने दिसून आले. याबाबत भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी सांगितले की, राज्यात आमची युती आहे; मात्र स्थानिक पातळीवर अद्याप मनोमिलन झालेले नाही. शिवसेना शिंदे गटाकडून सहकार्य मिळाल्यास आम्ही सहकार्य करण्यासाठी केव्हाही तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.यावर नगरसेवक उल्हास पगारे यांनी आम्ही युतीधर्म पाळत असून आवश्यक ते सहकार्य करीत आहोत, असे सांगितले. मात्र, न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने पहिल्या विषयाला आमचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव नगरसेवकाची पक्षाच्या फलकासह उपस्थिती दरम्यान, नगरसेवक आकडा राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यानंतरची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे विशेष लक्ष लागले होते.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे भुसावळ नगरपालिकेतील एकमेव नगरसेवक सोहेल पठाण हे पक्षाचा फलक घेऊन सभेला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थिती चीही सभागृहात चर्चा झाली एकंदरीत, 31 विषयांना मंजुरी देत सभेचे कामकाज शांततापूर्ण वातावरणात पार पडले. मात्र, मागील सभेचे वृत्तांत कायम करण्याच्या पहिल्या विषयावर झालेला आक्षेप, भाजप-शिवसेना शिंदे गटातील स्थानिक पातळी वरील मतभेद आणि विविध नगरसेवकांनी मांडलेल्या प्रभागनिहाय समस्यांमुळे ही सर्वसाधारण सभा चर्चेचा विषय ठरली.








