हतनूर धरणावर तिरंगा रोषणाई; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी

भुसावळ प्रतिनिधी गोपी अण्णा
जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या हतनूर धरणाच्या दरवाजांवर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने गुरुवार, दि. 13 ऑगस्ट रोजी आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या प्रकाशाने धरणाचे दरवाजे उजळून निघाल्याने परिसराचे दृश्य अत्यंत मनमोहक झाले आहे.देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त करण्यात आलेल्या या तिरंगा रोषणाईमुळे हतनूर धरण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोषणाई पाहण्यासाठी परिसरातील तसेच आसपासच्या गावांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. अनेक नागरिकांनी या आकर्षक रोषणाईचे मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ काढून हा क्षण आपल्या आठवणीत साठवून ठेवला.हनतूर धरण हे परिसरातील महत्त्वाचे जलसाठ्याचे ठिकाण असून, धरणाची भव्यता आणि रात्रीच्या वेळी करण्यात आलेली तिरंगा रोषणाई यामुळे परिसराला एक वेगळेच आकर्षक रूप प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धरणावर फडकणाऱ्या तिरंग्याच्या रंगांची विद्युत रोषणाई नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त धरण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तिरंग्याच्या रंगांनी उजळलेले धरण पाहण्यासाठी नागरिकांची रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू होती. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हतनूर धरणाला करण्यात आलेली ही तिरंगा रोषणाई सध्या परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली असून, धरणाचे हे मनोहारी रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.









