गीतांजली एक्सप्रेसमधून 19.959 किलो गांजा जप्त,

भुसावळ प्रतिनिधी गोपी अण्णा
विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने “ऑपरेशन नारकोस” अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध प्रभावी कारवाई करत 19.959 किलो गांजा, अंदाजे ₹9,97,950/- किंमतीचा, जप्त केला.16 ऑगस्ट रोजी ट गीतांजली एक्सप्रेस भुसावळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 03 वर येत असताना, ड्युटीवर तैनात सुरक्षा आरक्षक लोकेश्वर यादव यांनी पुढील बाजूकडून दुसऱ्या डब्यातून उतरून खांद्यावर पांढऱ्या प्लास्टिकची गोणी घेऊन जात असलेल्या एका संशयित व्यक्तीस पाहिले.संशयित व्यक्तीकडे गोणीबाबत चौकशी केली असता, त्यामध्ये गांजा असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर संशयित व्यक्ती तसेच त्याच्या ताब्यातील गोणी रेल्वे सुरक्षा बल पोस्ट, भुसावळ येथे आणण्यात आली आणि या प्रकरणाची माहिती सहायक सुरक्षा निरीक्षक महिलाल सिंह यांना देण्यात आली.या घटनेची माहिती तत्काळ मंडळ सुरक्षा नियंत्रक, भुसावळ, वरिष्ठ अधिकारी, शासकीय रेल्वे पोलीस भुसावळ, सीआयबी भुसावळ तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल च्या ड्युटीवर असलेल्या शोधक श्वान “वीरू” याच्याकडून संशयित गोणीची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गोणीमध्ये अंमली पदार्थ असल्याची पुष्टी झाली.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानगी घेऊन तसेच नियमानुसार आवश्यक पत्रव्यवहार व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर संशयित गोणीची झडती घेण्यात आली. यावेळी गोणीमधून गांजाची 10 पाकिटे/बंडले जप्त करण्यात आली. ही कारवाई कॉन्स्टेबल कपिल कुमार, सीआयबी भुसावळ, जीआरपी कर्मचारी तसेच राजपत्रित अधिकारी श्री. जितेंद्र सिंहा, सहायक सुरक्षा आयुक्त, आरपीएफ भुसावळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जप्त केलेला गांजा सहायक सुरक्षा निरीक्षक महिलाल सिंह यांनी नियमानुसार जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतला.जप्त केलेल्या गांजाचे वजन केल्यानंतर त्याचे एकूण वजन 19.959 किलो असल्याचे आढळून आले. त्याची अंदाजे किंमत ₹9,97,950/- इतकी आहे. आरोपीची ओळख अरुण कुमार उर्फ सोनू, वडील लालू प्रसाद, वय 25 वर्षे, रा. ग्राम चरतीपुर, पोस्ट बारा, जिल्हा कानपूर, उत्तर प्रदेश अशी झाली.आवश्यक कागदोपत्री कार्यवाही पूर्ण केल्यानंतर आरोपी तसेच त्याच्या ताब्यातून जप्त केलेला गांजा पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जीआरपी भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आला. जीआरपी भुसावळ यांनी दिनांक 17.08.2026 रोजी आरोपीविरुद्ध NDPS Act, 1985 मधील कलम 8 आणि 20(ब)(II)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जीआरपी भुसावळ यांच्याकडून सुरू आहे.मध्य रेल, भुसावळ विभाग रेल्वे सुरक्षा बल रेल्वे मार्गाद्वारे होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी तसेच प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी “ऑपरेशन नारकोस” अंतर्गत सातत्याने सतर्क आणि कटिबद्ध आहे.रेल्वे प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, कोणतीही संशयास्पद व्यक्ती, बेवारस सामान किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित हालचाल आढळल्यास तत्काळ रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलीस किंवा संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. प्रवाशांची सतर्कता आणि सहकार्य रेल्वे परिसर सुरक्षित व अंमली पदार्थमुक्त ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.










