ताज्या बातम्या

जळगाव महानगरपालिका तंत्रज्ञान अभ्यासाच्या जोरावर आदर्श लोकप्रतिनिधी घडवा – दीपक करंजीकर नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून ‘कार्यक्षमता वृद्धी’ कार्यशाळा संपन्न


जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष ‘कार्यक्षमता वृद्धी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अर्थतज्ञ, लेखक आणि महाराष्ट्र नीती आयोगाचे सदस्य दीपक करंजीकर यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानाची कास धरण्याचे आणि कृतीशील कामातून आपली ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक व सभागृह नेते नितीन लढ्ढा होते. मंचावर महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, अतिरिक्त आयुक्त शोभाताई बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, तसेच वित्त व लेखा अधिकारी विजयकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. महापौर दीपमाला काळे यांनी प्रास्ताविकातून या कार्यशाळेमागचा उद्देश स्पष्ट केला. “एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून घडण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण घेण्याची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.वक्ते दीपक करंजीकर यांनी सांगितले की, नगरसेवक म्हणून कामकाजाची माहिती मिळवण्यासाठी दररोज अपडेट राहा. तंत्रज्ञानाशिवाय आता पर्याय नाही, त्यामुळे डिजिटल युगाशी जुळवून घ्या,” असे करंजीकर यांनी सांगितले. पुढील १०० दिवसांत कोणत्याही पाच महत्त्वाच्या कामांची निवड करून ती पूर्णत्वास नेण्याचा निर्धार करा. जळगावची लोकसंख्या सहा लाखांवर आहे. शहरातील डॉक्टर, वकील, कलाकार अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची ‘डेटा बँक’ तयार करा, जेणेकरून शहराच्या विकासात त्यांची मदत घेता येईल. महापालिकेच्या ग्रंथालयातील ५८ हजार पुस्तके जनतेसाठी कशी उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. शहर शिस्तबद्ध करायचे असेल, तर आधी स्वतःला शिस्त लावा आणि स्वतःचे ‘डॉक्युमेंटेशन’ पक्के ठेवा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात नितीन लढ्ढा यांनी सांगितले की, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांचा स्वतःचा अभ्यास असणे आवश्यक आहे. अभ्यासू व्यक्तिमत्वच सभागृहात आणि प्रशासनात आपली छाप पाडू शकते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका ॲड. सुचिता हाडा यांनी केले, तर परिचय नगरसेविका सुरेखा तायडे यांनी करून दिला. आभार नगरसेविका गायत्री राणे यांनी मानले.या कार्यशाळेला एकूण ४५ नगरसेवकांनी उपस्थिती लावली. या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पुढील १०० दिवसांत पुन्हा एकदा दीपक करंजीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button