ताज्या बातम्या

जळगाव महापौरांकडून महामार्ग स्वच्छतेचा ‘ऑन द स्पॉट’ आढावा! जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांची सातत्याने कार्य करण्याची मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार राष्ट्रीय महामार्गावर केली स्वच्छता अभियानाची पाहणी


जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शहराच्या प्रवेशद्वाराला म्हणजेच महामार्गाला स्वच्छ आणि सुंदर करण्याचे ध्येय हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत गेल्या दोन आठवड्यांपासून महामार्गाच्या दुतर्फा असलेला कचरा आणि साचलेले वेस्ट मटेरियल उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौरांनी महामार्गावर टी.एम. नगर परिसरात परिसरात अचानक भेट देऊन प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.जेसीबीच्या साहाय्याने कामाला वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता. महापौरांच्या सूचनेनुसार गेल्या १५ दिवसांपासून हा परिसर चकाचक करण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी पाहणी दरम्यान टी. एम. नगर परिसरात जेसीबीचा वापर करून सर्व वेस्ट मटेरियल आणि डेब्रिज उचलण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे दिसून आले. महामार्गावरील कचरा उचलण्याच्या कामाची प्रगती पाहून महापौरांनी समाधान व्यक्त केले.मात्र, ही स्वच्छता केवळ तात्पुरती न राहता सातत्यपूर्ण राहावी, यासाठी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या मुख्य मार्गावर पुन्हा कचरा साचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यामुळे महापालिका प्रशासन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये तत्परता दिसून येत असून, जळगावचा महामार्ग आता मोकळा श्वास घेताना दिसत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button